या स्वातंत्र्यचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील कि पुन्हा गमावून बसेल ? हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो . भारत पूर्वी कधी स्वतंत्र देश नव्हता असे नाही . परंतु येथे असा मुद्दा उपस्थित होतो कि , त्याला एकेवेळी स्वातंत्र्य होते पण तो ते गमावून बसला . तो आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा गमावेल काय?देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे. माझ्या मनाला जास्त टोचणी जिची लागलेली आहे ती गोष्ट हि की , भारताने आपले जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवासांच्या कपटी कारस्थनामुळे ! हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. महंमद बिन कासीम याने सिंधवर जेव्हा स्वारी केली तेव्हा सिंधचा राजा दाहीर यांच्या सेनापतींनी महंमद बिन कासिमच्या हस्तकांनी दिलेल्या लाचा स्वीकारल्या आणि दहार राज्याच्या बाजूने लढण्यास नकार दिला . भारतावर चाल करून येण्याचे आणि पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढाई करण्याचे आमंत्रण जयचांदणे महंमद घोरीला दिले आणि या कार्यात मी स्वतः व सोळंकी घराण्यातील राजे तुला मदत करू असे जयचंदाने महंमद घोरीला आश्वासन दिले . शिवाजी महाराज हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना मराठे सरदार आणि राजपूत राजे हे मोगल बादशाच्या बाजूनेच लढत होते. ब्रिटिश लोक शिख राजांचा निःपात करण्यात करण्यात गुंतलेले होते , तेव्हा शिखांचा प्रमुख सेनापती हा स्थब्ध बसला ब्रिटिशनच्या तावडीतून राजपूत राजांना सोडविण्याचा त्याने काडीमात्र प्रयत्न केला नाही . १८५६ मध्ये भारतातील बऱ्याच भागांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला असता शीख लोक बघ्यासारखे वागत होते . भारताच्या इतिहासात या ज्या घडामोडी झाल्या त्याची पुनरावृत्ती होईल कि काय या विचारानेच माझे काळीज चर्र होते. जातीभेद आणि धर्मभेद हे आपले जुने शत्रू आहेत .नवीन नवीन निरनिराळे ध्येये पुढे जे राजकीय पक्ष उत्पन्न झालेले आहेत व होणार आहेत यांची आता आपल्या जुन्या शत्रूंमध्ये भर पडणार आहे ही जाणीव माझ्या मनाला झाली असल्यामुळे आपल्या देशाचा भविष्यकाळ कसा काय जाणार याची मला जास्त चिंता वाटू लागलेली आहे . हिंदी लोक आपल्या पक्षाच्या मतप्रणालीपेक्षा आपल्या देशाला जास्त महत्व देत आहेत कि आपल्या पक्षाच्या मतप्रणालीला जास्त महत्व देणार आहेत मला सांगता येत नाही पण एवढे मात्र खास की जर निरनिराळे पक्ष आपल्या देशापेक्षा आपल्या मतप्रणालीला जास्त महत्व देतील तर आपले स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांदा संकटात सापडेल आणि कदाचित कायमचेच नष्ट होईल .असेल संकट आपणावर येऊ नये यासाठी आपण सर्वानी जय्य्त तयारी ठेवली पाहिजे . आपल्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण सावतंत्राचे संरक्षण प्राणपणाने करू असा आपण दृढ निश्चय केला पाहिजे .
#WhatIRead
From अंधारातील दीपस्तंभ
Comments
Post a Comment