लग्नाचा-जोडीदार कसा हवा? आजच्या तरुण लग्नाळू मुलींचे मनोगत..
आपल्याला ज्या व्यक्तीसोबत उरलेले संपूर्ण आयुष्य काढायचे तो, विचारांनी परिपक्व, उच्चशिक्षित, वेलसेटल तर हवाच, पण मुख्य म्हणजे तो ओपन माईंडेड असावा. म्हणजे त्याने बायकोला इथेच का गेलीस? त्याच्याशी हसलीच का? अमक्याशी का बोलली? मला न विचारता असे का केले? असली फालतू कटकट करायला नको. अर्थात तो पत्नीवर दृढ विश्वास ठेवणारा असावा. ही आहे आधुनिक युगात वावरणाऱ्या मुलींची भावी नवऱ्याबद्दलची संकल्पना...
खरं तर, मुलीच्या लग्नाचा विषय आला की, आई-वडील वरसंशोधनाच्या कामात व्यस्त होतात. ते इतके व्यग्र होऊन जातात की, स्थळ त्यांना पटलं रे पटलं की मुलीच्या भावभावनांचा विचार न करताच त्यांच्या कल्पनेनुसार चांगलं वाटणारं स्थळ ते नक्की करतात. हे करताना आई-वडिलांना केवळ आर्थिक आणि बाह्य स्थितीची कल्पना असते. अर्थातच मुलाचा स्वभाव, आचरण या बाबींचा विचारही कधी केला जात नाही आणि त्यांच्या लेखी या बाबीला तसे महत्त्वही दिले जात नाही. पण आजच्या महाविद्यालयीन तरुणी आपल्या भावी पतीबद्दल ज्या अपेक्षा बाळगून आहेत, नवऱ्याबाबत त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या नेमक्या मुलाच्या व्यक्तिगत आचार-विचारांशी संबंधितच असल्याचे दिसून आले आहे.
विविध वाहिन्यांवरील मालिकांमधील मनमिळाऊ, प्रेमळ, हॅन्डसम नायक पाहिला की बस्स... अगदी अस्साच नवरा मलाही मिळणार, अशी इच्छा या मुलींच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. मात्र, प्रत्यक्षात जोडीदार शोधताना मुलींच्या भावनांना किती मोल दिलं जातं हा संशोधनाचा विषय आहे. आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना काहीतरी साम्य असायला हवे. या बरोबरच एकमेकांबरोबर कंफर्टेबलही वाटायला हवे, असे अनेक तरुणींचे म्हणणे आहे. प्रेमविवाहात मुलींना जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य असले, तरी नियोजित लग्नात आई-वडिलांच्या विचारांनाच प्राधान्य द्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आपण बदलून शहाणे केव्हा होणार?
लग्नाच्या रेशीमगाठी म्हणजे एकमेकांच्या साथीने आयुष्यातील सुख-दुःखाचे क्षण संयुक्तपणे अनुभवण्याचं दिलेलं अभिवचन. यासाठी काही जुजबी गोष्टींपेक्षाही आवश्यक असतात, ती एकमेकांची मनं जुळणे. ठराविक चौकटीतील गोष्टी जुळल्या, की खरंच ही मनं जुळतातच असे नाही. त्यामुळे आताच्या मुली आपल्या जोडीदाराला त्याच्या गुण-दोषांसकट स्वीकारण्याची मानसिकता ठेवतात. प्रत्येकात काही ना काही तर कमी असणारच आणि आपण कुठे सर्वगुण संपन्न आहोत, असा विचार आताच्या तरुण मुली करू लागल्या आहेत. कारण मुलींमध्ये उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर शाळेत, महाविद्यालयात आणि नोकरीच्या ठिकाणी मित्रांबरोबर मिळणारी समान वागणुकीमुळे मुला-मुलींमधील मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. महाविद्यालयीन ग्रुपमध्ये अनेक मुले-मुली एकमेकांचे जिवाभावाचे मित्र-मैत्रीण असतात. त्यामुळे आता "एक लडका और लडकी के बीच कभी सिर्फ दोस्ती नहीं हो सकती', हा समज गळून पडला आहे. म्हणून याचाच स्वीकार करणारा आणि आपल्या पत्नीला इतरांशी बोलण्याचे आपले मत मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देणारा मुलगा जोडीदार म्हणून हवा. आयुष्याचा जोडीदार निवडताना स्त्री-पुरुष एकमेकांचे सौंदर्य जोखून पाहतात. जोडीदार निवडण्याचा काळ हा वयात येतानाच साधारणपणे असतो. जोडीदार निवडीचा पहिला निकष सौंदर्य हाच असतो ही विचारसरणीदेखील आता मागे पडली असून, आपल्या जोडीदाराच्या दिसण्यापेक्षा त्याचे समाजातील अस्तित्व, वागणूक म्हणजे चारचौघात त्याच्या असण्याने काय फरक पडतो, याबाबत मुली चोखंदळ असल्याचे दिसते. मुलाचा स्वभाव मनमिळाऊ आणि समजूतदार असला, तर त्याचे दिसणे, काळा-गोरा या गोष्टी खूप महत्त्वाच्या नसल्याचे वाटते.
*आयुष्यभर साथ देणारा जोडीदार निवडताना दोघांचे विचार, आवड-निवड, छंद, जीवनशैली जुळणे याला आजची पिढी खूप महत्त्व देते. त्यामुळे केवळ जात, धर्म यांना फारसे महत्त्व न देता विवाहेच्छूक मुली जोडीदाराची नोकरी, शिक्षण, कुटुंब या गोष्टींवर अधिक भर देत आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या मोठी असल्याने, घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा अशी सहाजिकच मुलींची अपेक्षा असते. त्यामुळे आपल्या जोडीदाराने आपल्याला नोकरी करण्याचे व आपले पैसे खर्च करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे, असे सुमारे अनेक तरुणींना वाटते.*
जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे समाजातील बदल स्वीकारून आपल्या पत्नीला एक स्री म्हणून वागविण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून वागविणारा व संपूर्ण स्वातंत्र्य देणारा खुल्या मनाचा जोडीदार हवा असतो, हे आता तरी अशा तरुण मुलींचे पालक जुनी विचारसरणी सोडून त्यांच्या मुलींच्या भावना लक्षात घेतील काय?
Comments
Post a Comment